Friday, 17 March 2017

आनंद Bank आणि love Bank

आनंद Bank आणि love Bank
लेखन- श्री.एच.बी.पुरी

आपल्या आनंदाच्या बँकेतील खात्यावर जेव्हा भरपूर जमा असते तेव्हा आपण इतरांनाही आनंद वाटतो.जेव्हा त्या खात्यावरील शिल्लक कमी होते तेव्हा आपण इतरांकडून आनंद हिरावून घेण्याची ,इतरांच्या खात्यावर डल्ला मारण्याची खटपट करतो.त्याचप्रमाणे आपल्या प्रेम बँकेतील खात्यावर भरपूर शिल्लक असते तेव्हा आपण इतरांना प्रेम वाटतो.त्या खात्यावर जेव्हा बाकी शून्य होते,खाते रिकामे होते तेव्हा इतरांबद्दल आपण द्वेष,मत्सर,इर्षा करू लागतो.
            या दोन्ही बँकांचा परस्परांशी घनिष्ट संबंध आहे. एकमेकांवर त्याचा परिणाम होतो.आनंद बँकेतील खात्यावर भरपूर जमा असते तेव्हा प्रेम वाटतो;प्रेम बँकेतील खात्यावर भरपूर जमा असते तेव्हा आपण आनंदात असतो.
        आनंदी राहण्यासाठी प्रेमाची बँक भरलेली असणे गरजेचे आहे.प्रेमाची बँक पुढील पाच प्रकारे भरता येऊ शकते
उपहार किंवा भेट,सहवास,सकारात्मक प्रतिसाद, सेवा आणि स्पर्श..
      वरील पाचही प्रकार विस्तृतपणे मांडणार आहे उद्या पासून... (क्रमशः)
    

मनसोक्त जगा

सांगावंसं वाटतंय की, विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का?

माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, "मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे"

"जाऊया की मग...त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला." असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो *उद्या* आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!

मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय...कितीतरी जणांचे *उद्या* गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले. पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती
*"अभ्यास करत नाही  म्हणून रागवायचे मी त्याला...आता?"*

*"नेहमी भांडायचो आम्ही...माहेरी जाईन, घटस्फोट देईन पर्यंत जायची भांडणं, आता?"*, कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती

नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण?
जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि...आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं.

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य उगवतो? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो...मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल...

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये *प्रेझेंट* म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही,ह्या भाग्याला  सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलमधले रोगांशी झुंजणारे पेशंट दाखवावेसे वाटतात .

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

*अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?*

पिक्चरच्या  शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. *पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात.*

*म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर...?*

Friday, 25 November 2016

सुख एक मृगजळ

🌷सुख हे खरोखरीच मृगजळ आहे का ?

सामान्य लोकांना सुख म्हणजे काय हे समजत तर नाहीच पण मोठमोठया विद्वान लोकांना सुध्दां सुख हे मृगजळ आहे असे वाटते .

याचे मुख्य कारण असे की , माणसे सुखाचा अमृतानुभव अनुभवण्याऐवजी ते सुखाच्या कल्पनेचा काल्पनिक भोग घेत असतात .

सुखाची कांही तरी कल्पना करुन घेऊन त्याच्या पाठीमागे लागल्याने सुख हाताला लागेलच कसे ? आणि अशा प्रसंगी सुख हे मृगजळ आहे असे म्हणण्यात काय अर्थ आहे बरे ?

लोक ज्या मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न करतात त्याच्या नेमका उलटा मार्ग लोकांना ज्ञात नसल्यामुळे लोकांना सुखाचा शोध लागत नाही .

वास्तविक , ज्या जीवाला  सुखाचा ध्यास लागलेला असतो आणि जो त्या सुख प्राप्तीसाठी कशाचाही व कोणाचाही ध्यास व्हावयास तत्पर असतो , तो जीव स्वतःच पूर्णतः सुखस्वरुप असतो .

सुख मिळविण्यासाठी माणुस जितके अधिक प्रयत्न करतो तितका तो सुखापासून दूरदूर फेकला जातो .

याच्या उलट सुख मिळविण्याची धडपड करण्याचे माणसाने बंद केले व एका विशीष्ट सदगुरुप्रणित मार्गाने स्वतःच्या सुख स्वरुपाचे ज्ञान करुन घेतले की त्याला सुखाचा साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव तात्काळ येऊ शकतो .

म्हणुनच तुकाराम महाराज सांगतात -

१) बैसोनि निवांत शुध्द करी चित्त ।तया सुख अंत नाही पार ।
येऊनी अंतरी राहील गोपाळ । सायासाचे फळ बैसलीया ।।

२) तुका म्हणे सुख देह निरसने । चिंतन चिंतने तद्रुपता ।।

 
       *卐 शुभ चिंतनमय क्षण 卐*
           
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

Thursday, 21 July 2016

आनंद सर्वव्यापी आहे

आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी

आनंद हा सर्वव्यापी आहे. ...
 
   उगाचच जगायचे आहे म्हणून जगण्यात काय अर्थ आहे?  स्वतःसाठी जगत असताना  दुसऱ्यासाठी जगण्याची संधी शोधत रहा. लहानांत लहान बनून खेळण्यात आनंद आहे, कळीचे फुलात रुपांतर बघण्यात आनंद आहे, मित्रासोबत गप्पा मारण्यात आनंद आहे, वृद्धांना मदत करण्यात आनंद आहे, दीन दुबळ्या गरीब भुकेलेल्यास अन्नदान करण्यात आनंद आहे, परिवार, कुटुंबाची काळजी घेण्यात आनंद आहे, निस्वार्थ प्रेम करण्यात आनंद आहे.
       सुख दुख, यश अपयश , जास्त श्रीमंत बनण्याचा हव्यास , या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्यात आनंद आहे. दुसऱ्याची अवहेलना करण्यापेक्षा स्वताला आरशात बघण्यात आनंद आहे. काम, क्रोध, लोभ,मद मत्सर, द्वेष या षडरिपुंचा त्याग करण्यात आनंद आहे.
      निखळ आनंद , सुख, समाधान , शांतता हवी असेल तर ती आपणच आपल्या आयुष्यात आणू शकतो. आनंदाच्या डोहात आनंदाचेच तरंग निर्माण होतात. म्हणूनच आनंद हा सर्वव्यापी आहे. शोधा म्हणजे सापडेल. नाही का? ???
                                 धन्यवाद !

Wednesday, 13 July 2016

कामातील आनंद

आनंदमार्ग
लेखन - श्री. एच. बी. पुरी
कामात लपलेल्या अानंदाचे कंगोरे शोधा प्रत्येक कामात आनंदाची एखादी गोष्ट असते. तुम्हाला त्याचे कंगाेरे शोधायचे आहेत. कामानेच आनंद मिळेल.

सकाळी उठल्यानंतर फक्त दाेन मिनिटे आरशासमोर उभे राहा आणि कल्पना करा की, दिवसभरात तुम्हाला काय मिळवायचे आहे. जे काम कराल, मन लावून करा. तसे केले तरच आनंद मिळतो आणि यशही मिळेल. चांगले काम कधी वाया जात नाही कोणतेही चांगले काम कधी वाया जात नाही. मग ते कितीही लहान असो.

दुसऱ्यासाठी काही ना काही करत राहा. बसमध्ये गरजूंना आपले अासन द्या. कोणासाठी दरवाजे उघडा, कोणाच्या कपड्याचे कौतुक करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होईल. "Be Positive, Be Active " धन्यवाद !!

प्रयत्नशील बना

प्रयत्नशील बना
लेखन -श्री. एच. बी. पुरी

पावसाचे थेंब भलेही छोटे- छोटे असूद्या पण जर पाऊस सतत सुरू राहिला तर मोठ्या जलाशयात रूपांतर होते. असेच आपले छोटे छोटे प्रयत्न निश्चितच जीवन परिवर्तन करण्यास सहाय्यक ठरतील.

प्रयत्न किंवा साहस छोटे किंवा मोठे हे महत्वाचे नाही तर त्यात सातत्य असणे  आवश्यक आहे. माणूस प्रयत्नवादाने काहीही करू शकतो. नदीच्या काठावर बसून राहिला तर त्याला पोहता येणार आहे का?  पाण्यात पडल्यावर हात पाय हलवून नक्की पोहता येते.

म्हणून "Try Try But Don't Cry"
प्रयत्न करत रहा यशाची पहिली पायरी चढणे  सोपे जाईल.
                                           धन्यवाद !!

पाॅलिश पेपर

पाॅलिश पेपर
लेखन - एच. बी. पुरी

जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात. अनुभवाने माणूस शहाणा होतो यावर माझा ठाम विश्वास आहे. "Nothing in the world good or bad we make it". या जगात चांगले आणि वाईट असे काहीच नसते आपण ते ठरवतो. चांगल्याला वाईट म्हणणारे लोक असतात आणि वाईटाला चांगले म्हणणारेही लोक असतात. असो. ...
    आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर आपण कमळाच्या पानांसारखे रहायला हवं. म्हणजे बघा कमळ पाण्यात, चिखलात फुलते मात्र त्यावर पाणी साचत नाही किंवा चिखलही साचत नाही.
      आता पाॅलिश पेपर म्हणजे  काय ते सांगतो . असे म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी" कारण जे आपली निंदा करतात ते आपल्यासाठी पाॅलिश पेपर सारखे काम करतात. निंदा करणारे आपल्या त्रुटी, दोष दूर करण्याचे काम करतात आणि मग आपण अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच आपल्याला प्रेरणा मिळते. 
       म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतात असं मला वाटतं. पटतयं का?